अण्णा हजारे यांचे वक्तव्य केवळ आसुयेमुळेच : रतन पाटील

अण्णा हजारे यांचे वक्तव्य केवळ आसुयेमुळेच : रतन पाटील

by Team Satara Today | published on : 09 February 2025


सातारा : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली, ती टीका त्यांनी व्यक्तिद्वेष आणि केवळ आसुयेमुळेच केली असल्याचे मत सातारा जिल्हा आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माझ्याबरोबर एकेकाळी दारूच्या विरोधात लढा देणारे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय, दारूच्या दुकानांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले. सत्ता मिळवल्यानंतर समाजसेवा करण्याऐवजी सत्ता व पक्षाची हवा त्यांच्या डोक्यात गेली. दारूमुळेच जनतेने त्यांना नाकारले, अशी तिखट प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे बोलताना व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने आम आदमी पार्टीतील कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहे.

याबाबत बोलताना रतन पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षात अण्णा हजारेंनी बर्‍याच घटनांमध्ये मौन बाळगले. त्यांच्या या मौनाबाबत त्यांनी बोलले पाहिजे. देशात मराठा आरक्षण, संतोष देशमुख हत्या, अजित पवार यांचा जलसिंचन घोटाळा, राजकारणात होणारी स्थित्यंतरे, वाढती महागाई, बेरोजगारी, देशात होणार्‍या अत्याचाराच्या घटना अशा नानाविध प्रश्‍नांकडे अण्णा हजारे यांनी सोयिस्कररित्या डोळेझाक केली. मात्र, ज्या अरविंद केजरीवाल, अंजली दमानिया यांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले, त्याच केजरीवालांचे सरकार कोसळल्यानंतर मात्र हजारे यांना कंठ फुटला आहे. अण्णा हजारे हे काय भाजपला अंतस्थ पाठींबा देत आहेत का, हाही त्यांच्या विधानातून प्रश्‍न पडत आहे. त्यांना जर खरेच जनतेच्या प्रश्‍नांची जाण असेल तर त्यांनी इतरही बाबींवर भाष्य करावे. त्यांचे वक्तव्य केवळ अरविंद केजरीवाल यांच्यावरील आसुयेमुळेच आले आहे.

वास्तविक पाहता अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप केवळ बिनबुडाचे आहेत. त्या आरोपांची अजून चौकशी सुरु आहे. या आरोपांमध्ये जर काही सत्यता असती, तर केजरीवाल यांना जामीन झालाच नसता. त्यामुळे भाजपने षडयंत्र करुन केजरीवाल यांना बदनाम करण्याच्या हेतूने केलेले ते कारस्थान होते, असे आम्ही मानतो. केजरीवाल हे नेहमीच संघर्षातून वर आलेले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे याही निकालामधून बोध घेवून ते पुढील वाटचाल करतील आणि आम आदमी पार्टीचा झेंडा पुन्हा दिल्लीवर फडकलेला आम्हास पहावयास मिळेल, असेही पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सध्या काँग्रेस पक्षाचा संक्रमणाचा काळ
पुढील बातमी
बनावट फोन पे चा वापर करून गंडा घालणारा भामटा जेरबंद

संबंधित बातम्या