- संजय गायकवाड
फलटण : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) सर्वेसर्वा अजित पवार यांची फलटणशी सोयरिक होणार आहे. त्यांचे कनिष्ठ पूत्र जय पवार यांचा फलटण तालुक्यातील प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी विवाह होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये गेल्यावर्षी उभी फूट पडल्यानंतर प्रथमच काल संपूर्ण पवार कुटूंब राज्यातील जनतेला एकत्र दिसले. पक्षफूटीनंतर बंडाचा झेंडा हाती घेत अजित पवारांसह बंडखोर नेत्यांनी महायुतीमध्ये सामील होत सरकारमध्येही मानाचे पान मिळवले होते. गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार कुटूंबामध्ये भाऊबंदकी उफाळून आली होती. नणंदेविरुद्ध भावजय व काका विरुद्ध पुतण्या, असा सामना संपूर्ण राज्याने पाहिला. परंतू राजकारण, हे राजकारणाच्या ठिकाणी व कुटूंब ते त्याच्याठिकाणी, असा प्रघात पवार कुटूंबियांकडून पाळला गेलेला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराने गेली तीन टर्म आमदार असणार्या दीपक चव्हाण यांना पराभवाची धूळ चारत फलटणमधील राजे गटाचे संस्थान खालसा केले होते. बारामती शेजारीच असलेल्या फलटणमध्ये अजित पवारांच्याच विचारांचा आणि पक्षाचा आमदार निवडून आल्यामुळे आतातरी फलटण तालुक्याचा विकास होईल, अशी पालवी जनतेच्या मनामध्ये फुटली होती. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची सोयरिकच फलटण तालुक्यात होणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्येष्ठ दिवंगत नेते तथा सहकार महर्षी हणमंतराव पवार (अण्णा) यांची नात म्हणजेच फलटणमधील उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिच्याबरोबर येत्या 10 एप्रिल रोजी जय पवार यांचा साखरपुडा होणार असून याबाबतचे निमंत्रण खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांना देण्यात आले आहे. खा. सुळे यांनी याबाबतचा संपूर्ण पवार कुटूंबियांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील तपशीलही टाकल्यामुळे लग्नाच्या निमित्ताने का होईना, पवार कुटूंब पुन्हा एकदा एकत्र येत आहे आणि या सोहळ्याच्या माध्यमातूनच दुभंगलेल्या पवार कुटूंबामध्ये पुन्हा एकदा दिलजमाई होतेय का, हे पाहणे फलटण तालुक्यासह महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये औत्सुक्याचे ठरणार आहे.