सातारा : मराठा आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. जे माझ्या पोटात असते तेच मी ओठावर असते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
जलमंदिर पॅलेस येथे मराठा आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मी वेळोवेळी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित नसल्याने मी मुंबईला जाऊ शकलो नाही. यापूर्वीच्या तत्कालीन आंदोलनाच्या परिस्थितीत मी स्वतः आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत. या भावनांची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांचे प्रतिनिधी पाठवून जरांगे यांच्या शिष्टमंडळाशी तत्काळ चर्चा करावी आणि या प्रकरणात ताबडतोब मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने खासदार संजय राऊत यांनी काही राजकीय वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांच्या निमित्ताने केली होती. त्या वक्तव्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले टीका करणार्यांनी नेहमी संकुचित विचार न करता मोठा विचार करावा. त्यांचे नाव घेऊन मला या प्रश्नावर त्यांना मोठे करायचे नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात मी अद्याप मुख्यमंत्र्यांशी बोललेलो नाही. पण लवकरच फडणवीस साहेब या प्रश्नातून मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.