सातारा दिनांक 19 प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या लाडक्या बहीण लाभार्थी सन्मान योजनेच्या कार्यक्रमासाठी बहिणींना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साताऱ्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सातारा आगाराच्या तब्बल 400 बसेस अचानक ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा वगळता सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटी सेवा रविवारी अचानक कोलमडली .पहाटे चार वाजल्यापासून प्रवाशांना एसटी स्टँड मध्ये ताटकळत उभे राहावे लागले या घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने या प्रकाराचा निषेध करण्यात आला
मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्याचा फटका सातारा जिल्ह्याच्या एसटी सेवेला रविवारी बसला. जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणींना साताऱ्यात आणण्यासाठी रात्री उशिरा 400 बसेस अचानक ताब्यात घेतल्या, त्यामुळे रविवारी सकाळी कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या प्रवाशांना सातारा आगारामध्ये तब्बल साडेपाच तास ताटकळावे लागले यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. सातारा जांभे ही एकमेव ग्रामीण भागाची एसटी वगळता एसटीच्या तब्बल 112 फेऱ्या रद्द झाल्या. मुंबई पुणे येथून आलेल्या प्रवाशांना खाजगी वाहनाचा भुर्दंड सोसावा लागला. शिवसेनेचे तालुका पदाधिकारी पहाटे साडेसहा वाजता मुंबईहून आले असता त्यांना लांब पल्ल्याच्या वगळता सर्व एसटी रद्द झाल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना कल्पना दिली.
सचिन मोहिते आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले. आगारांमध्ये सुमारे 280 गाड्या उभ्या होत्या आणि प्रवासी मात्र एसटी उपलब्ध नसल्यामुळे विनाकारण खोळंबून राहिले होते सचिन मोहिते यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला यावेळी अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी कॅमेऱ्यातून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांचा मोबाईल हिसकावण्याचा एक अधिकाऱ्याने प्रयत्न केला. या प्रकाराची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची थेट कल्पना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आली आहे. एसटी प्रशासनाच्या वतीने सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे ढकलण्यात आली प्रवाशांना अचानक काही न सांगता एसटी ताब्यात घेणे आणि त्यांची गैरसोय करणे हे चुकीचे आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या प्रकाराचा निषेध करत आहे एसटी आगाराने आपल्या सेवा तातडीने सुधारल्यास यापुढे यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सचिन मोहिते यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या 80 टक्के ग्रामीण भागामध्ये एकही एसटी बस न पोहोचू शकल्याने सातारा आगाराचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले .