शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा!

शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, नाले, गटर स्वच्छता, पथदिवे, शहर सौंदर्यीकरण या बाबींवर भर द्यावा. कोणत्याही स्थितीत शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद, नगर पंचायतींच्या विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरण याबाबतीत नगर पालिकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. कराड, सातारा या शहरांसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात शहर स्वच्छतेचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

पालकमंत्री म्हणाले, शहरातील प्रमुख रस्त्यांवर नगर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्याद्वारे कचरा व घाण पसरविणाऱ्यांवर नजर ठेवावी व दंडात्मक कारवाई करावी. रात्रीच्या वेळी डीप क्लिनींग सुरु करावे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत सक्षमपणे चालविणे आवश्यक आहे. भविष्यात नगर पालिकांच्या कक्षा रुंदावणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन आत्ताच कचरा डेपो शहरातून बाहेर हलविण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी जागेचा शोध घ्यावा. येत्या काळात सर्व नगर पालिका सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. ही बाब ध्यानात घेऊन त्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात यावा. जे दोन्ही प्रकारचे कचरे एकत्र देतील अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. दुकानदार व्यवसायिकांनी कचरा इस्तत: पसरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पुर्वी ग्रामविकास विभाग गुड मॉर्निंग पथके कार्यरत ठेवत होता, त्याप्रमाणे स्वच्छता पथके तयार करावीत. अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हीजीट द्यावी. यापुढे पालकमंत्री म्हणून नगरपालिका व नगर पंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, विविध विकास कामे यांचा नियमितपणे आढावा घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.



मागील बातमी
मंगल कार्यालयातून दागिन्यांसह रोकडची चोरी
पुढील बातमी
मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट घेऊन एसटीचा प्रवास

संबंधित बातम्या