बामणोली आश्रमशाळेच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात : तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

by Team Satara Today | published on : 22 November 2025


बामणोली :  कसबे बामणोली,  ता. जावली येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा याठिकाणी घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

आदिवासी विकास विभाग ठाणे,प्रकल्प कार्यालय घोडेगाव, ता. आंबेगाव जिल्हा पुणे अंतर्गत बामणोली आश्रमशाळा या ठिकाणी सोमवार दि. १७ ते बुधवार दि.१९ या कालावधीत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धांमध्ये कोते ता. राधानगरी, बोरबेट ता. गगनबावडा या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शाळा तसेच कुरुंजी व पांगारी ता. भोर या पुणे जिल्ह्यातील दोन शाळा व गोगवे ता. महाबळेश्वर व बामणोली ता. जावली या सातारा जिल्ह्यातील दोन शाळा अशा तीन जिल्ह्यातील एकूण सहा आश्रम शाळांसाठी बामणोली या केंद्रावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

एकूण तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. याचा शुभारंभ सरपंच जयश्रीताई गोरे,शाळा दक्षता समिती अध्यक्ष किशोर आप्पा शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मोसीना पठाण ग्रा.पं.सदस्य सुवर्णा शिंदे, विजय हरिबा पवार,प्रकाश सुतार,पत्रकार निलेश शिंदे,सागर पवार तसेच शाळा दक्षता समिती व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यामध्ये कबड्डी, खो - खो, हॉलिबॉल,लांब उडी,उंच उडी ,धावणे,गोळा फेक, भाला फेक या खेळांचा समावेश होता.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नेताजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक, अधिक्षिका ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडल्या.आरोग्य केंद्र बामणोली यांच्या वतीने स्पर्धा कालावधीत आपले कर्मचारी व रुग्णवाहिका त्या ठिकाणी उपस्थित ठेवून कोणत्याही खेळाडूला काही दुखापत होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.

ग्रुप ग्रामपंचायत बामणोली मधील सावरी, म्हावशी,बामणोली,पावशेवाडी या चारही गावातील ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले.तसेच बामणोली आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा केंद्र पूर्ववत सुरू केल्याने ज्यांच्या मतदार संघात ही शाळा येते असे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशसेवेसाठी युवकांनी झोकून द्यावे : अरुण गरुड; पुसेगावात संरक्षण सेवांतील करिअरच्या संधींबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन
पुढील बातमी
सातारा पालिकेसमोर वेगवान गाडीचा थरार; भरारी पथकाच्या गाडीला धडक; चार वाहनांचे नुकसान

संबंधित बातम्या