सातारा : सातारा जिल्हा दलित महासंघ ही संघटना समाजातील दलित, वंचित व सर्व जातीधर्मातील समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेच्या राज्य व जिल्हास्तरीय बांधणीसाठी नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक समानतेचा लढा तीव्र करण्यात येणार असून यासाठी मंगळवार, दि. 6 रोजी दुपारी 12 वाजता साताऱ्यात राजवाडा येथील अश्वमेध सभागृहात बैठक होणार असून यावेळी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण व उपाध्यक्ष सूर्यकांत काळे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघटनात्मक बांधणी, भविष्यातील वाटचाल व नवीन पदाधिकारी निवडी या विषयावर बैठकीत चर्चा, संवाद होणार आहे. यावेळी उमेश चव्हाण, सूर्यकांत काळे, डॉ. रमाकांत साठे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, उमेश चव्हाण यांनी सांगितले की, सध्याच्या सामाजिक, राजकीय स्थितीत सर्वसामान्यांचे जगणे अवघड होत चालले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडून गेले आहे. मुले शिकली आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या मिळत आहेत मात्र, वेतन कमी मिळत आहे. जाती, धर्मावरुन तेढ निर्माण करुन सामाजिक समता बिघवडण्याचे काम सध्याचे राजकीय नेतेमंडळी करत आहेत. याबाबत जनतेच्या मनात रोष आहे. आमचे जगणे निदान सुसह्य करा ही जनतेची मागणी आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास प्रशासन व सरकार तयार नाही.
महागाई कमी करणे, नवीन रोजगार निर्मिती करणे, सातारा जिल्ह्यातील युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण करण्याच्या नुसत्या हाकाट्या पिटल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात काहीही होत नसल्याने जनतेचा संघर्ष कमी होत नाही. समाजाला सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जगणे सुसह्य करणे यासाठी दलित महासंघ आंदोलन छेडणार असून या अनुषंगाने ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे उमेश चव्हाण यांनी सांगितले.
दलित महासंघाच्या संघटना बांधणीसाठी मंगळवारी साताऱ्यात बैठकीचे आयोजन; उमेश चव्हाण व सूर्यकांत काळे यांची माहिती
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा