डॉ. स्मिता जाधवांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेची - शंभूराज देसाई, मुख्यमंत्री फडणवीसांच्या शब्दावर महायुतीच्या प्रचारात सक्रिय; जिल्हा बँकेच्या जागावाटपावर आज निर्णयाची शक्यता

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या विजयासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक सक्रिय झाले असून, त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे, असा ठाम विश्वास पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र येण्याबाबत सूचना केल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना ताकदीने मैदानात उतरली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, एकनाथ ओंबळे, शारदाताई जाधव, राजाभाऊ बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन करून महायुतीचा संयुक्त मेळावा घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारात सहभागी होण्याचे आदेश दिले. दसऱ्याच्या दिवशीही शिवसैनिक एकत्र आले असून, स्मिताताईंच्या विजयासाठी जिल्ह्यात संघटितपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार प्रा. सचिन सानप यांच्यासाठीही फलटण, कराड, पाटण आणि सातारा येथे मेळावे घेऊन प्रचार सुरू केला आहे.
जुन्या जखमा विसरून महायुतीसाठी मैदानात!
जिल्हा परिषदेत यापूर्वी घडलेल्या सत्तानाट्याबाबत विचारले असता देसाई यांनी नाराजीला वाट मोकळी करून दिली. काही जखमा भरायला वेळ लागतो; मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असा विश्वास दिल्याने आम्ही महायुतीच्या प्रचारात सक्रिय झालो आहोत. कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
स्मिता जाधव यांना पाठिंबा देण्यास उशीर झाला का, या प्रश्नावर देसाई म्हणाले, "उशीर झाला असे म्हणण्यापेक्षा आम्ही तातडीने कामाला लागलो, असे म्हणा. मुख्यमंत्री आणि पक्षनेतृत्वाचा आदेश मिळताच शिवसैनिक शंभर टक्के ताकदीने प्रचारात उतरले आहेत."
जिल्हा बँकेच्या जागावाटपाचा फैसला आज?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागावाटपाबाबत देसाई म्हणाले, शिवसेनेच्या वतीने रामराजे नाईक-निंबाळकर, भाजपच्या वतीने शिवेंद्रराजे भोसले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री मकरंद पाटील चर्चा करणार आहेत. अद्याप चर्चा झालेली नाही. आज संध्याकाळपर्यंत चर्चा झाल्यास जागावाटपाचा निर्णय जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर देसाई यांनी पक्षाची भूमिका मांडली. राज्याच्या सर्वोच्च पदावर आपल्या पक्षाचा नेता असावा, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजनांना वेग मिळाला. आगामी निवडणुकांत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यात यश मिळाल्यास शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘राजधानी जल्लोष दांडिया’ उत्साहात संपन्न; मिनल राऊत ठरल्या ‘दांडिया क्वीन’
पुढील बातमी
शिक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये; २७ ऑक्टोबरला शिक्षकांचा विजय निश्चित : सचिन सानप

संबंधित बातम्या