कास तलावात 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

कुटुंबियांसमवेत क्रिकेट खेळताना पाय घसरला आणि पाण्यात बुडून मृत्यू

by Team Satara Today | published on : 18 May 2025


सातारा : कुटुंबियांसमवेत क्रिकेट खेळताना पाय घसरुन कास तलावात पडल्याने 9 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कास तलाव परिसरात आज एका कुटुंबासाठी आनंदाचा दिवस दुर्दैवी ठरला. आपल्या कुटुंबियांसमवेत क्रिकेट खेळत असताना 9 वर्षीय राकेश कमल विश्वकर्मा याचा बॉल तलावात गेला. निरागसपणे बॉल आणण्यासाठी गेलेल्या राकेशचा पाय घसरला आणि तो थेट 40 फूट खोल पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवले. शिवेंद्रसिंह राजे भोसले रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव कार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर पथकाने राकेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मात्र, खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता घटनेमुळे कास तलाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राकेशच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने घटनास्थळावरील वातावरण आणखी भावविवश झाले. आपल्या लहानग्याला हरवलेली आई-बाबा आक्रोश करत होते. त्यांच्या हंबरड्याने उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. शिवेंद्रसिंह राजे भोसले रेस्क्यू टीमचे जवानांनी जीवाचे रान करून बचाव कार्य केले. परंतु, खोल पाणी या परिस्थितीमुळे त्यांना लहानग्याचा जीव वाचवता आला नाही.कास तलाव परिसरात अशा घटनांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कुटुंबियांनी लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. तलावात उतरणे टाळावे, असे प्रशासनाने सांगितले. या हृदयद्रावक घटनेने सातार्‍यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवतीर्थ ही भविष्याची दृष्टी असणारी पुस्तिका
पुढील बातमी
कास धरणाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा रामभरोसे

संबंधित बातम्या