सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळ येथे धोम धरणाचा उजवा कालवा अचानक फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारावर स्थानिक शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या 24 तासांपासून कालव्यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. हे पाणी थेट रस्त्यांवर आल्यामुळे कुडाळ-मेढा-पाचगणी मार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की, तब्बल 5 किलोमीटर परिसरामध्ये हे पाणी पसरले असून, परिसरातील काही स्थानिक ओढेही तुंबल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक भागांत पाण्याची टंचाई भासत आहे. अशा दुष्काळी आणि कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. कालव्यांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे.
पाटबंधारे विभागाने तातडीने या ठिकाणी धाव घेऊन कालव्याची गळती थांबवावी आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.