सातारा : परिस्थिती अभावी किंवा इतर कारणांमुळे ज्या महिलांचे शिक्षण 5 वी उत्तीर्ण ते 10 वी अनुत्तीर्ण दरम्यान खंडित झाले होते, अशा महिलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद सातारा आणि प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांनी एकत्र येत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दोन्ही संस्थांमध्ये सन 2025-26 आणि 2026-27 या दोन वर्षांसाठी एक बिगर आर्थिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ‘सेकंड चान्स’ कार्यक्रम (शिक्षणाची पुनर्संधी) मिळवून महिलांनी यंदा दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात किमान 18 वर्ष पूर्ण झालेल्या एकूण 759 महिला दहावीच्या परीक्षेसाठी बसल्या होत्या, त्यापैकी तब्बल 697 महिलांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण होऊन दहावीची पायरी पार केली आहे.
या यशस्वी महिलांमध्ये ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा मोठा सहभाग होता. उमेदच्या एकूण 579 महिला परीक्षेला बसल्या होत्या, ज्यातील 542 महिलांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे. या महिलांनी पुढे जाऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे यश पाहून आगामी सन 2026-27 या वर्षासाठी आतापर्यंत 1,572 महिलांनी पुढे शिकण्याची इच्छा दर्शवली असून, त्यापैकी 519 महिलांचा प्रवेश निश्चित देखील झाला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच स्तरांतून महिलांचे कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत:
या संपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी काम करणार्या सर्व घटकांचे विशेष आभार आणि कौतुक करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण, ‘उमेद’ जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे तसेच जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे आणि प्रथम एज्युकेशन फौंडेशनच्या जिल्हा समन्वयक शाहीन सय्यद तसेच नूतन दळवी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यासोबतच, सर्व तालुक्यांमधील प्रथम फौंडेशनचा तालुका स्टाफ आणि उमेद अभियानातील सर्व तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक आणि सर्व प्रकारच्या ग्रामसखी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून महिलांचे समुपदेशन करणे, त्यांची तयारी करून घेणे आणि परीक्षा प्रक्रियेत अनमोल सहकार्य केले. सर्वांच्या सांघिक परिश्रमांमुळेच शेकडो महिलांच्या डोळ्यांतील शिक्षणाचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे.