सातारा : दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून राजू तानाजी कोरे (वय 43, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रहिमतपूर हद्दीतील चौकीचा आंबा येथे दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजता झाला. या अपघातात राजू कोरे यांची पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, राजू कोरे व त्यांच्या पत्नी सीमा कोरे हे दोघे सिद्धेश्वर किरोली येथून दुचाकीवरून रहिमतपूरला येत होते. वडूज-रहिमतपूर रस्त्याने येत असताना चौकीचा आंबा येथे रस्त्यात अचानक त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे आले. हे कुत्रे दुचाकीच्या पुढील चाकात अडकले. त्यामुळे दुचाकीचे पाठीमागील चाक उचलल्याने दोघेही हवेत उडून डोक्यावर पडले. यात राजू कोरे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर त्यांच्या पत्नीच्या हाता-पायाला गंभीर जखम झाली. दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजू कोरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी त्यांच्या पत्नीला सातार्यातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.