मोरगिरी : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे ‘मेघदूत’ निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई व कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, अस्मितादेवी देसाई, जयराज देसाई उपस्थित होते. मंत्री देसाई हे नुकतेच मुंबईतील ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले. या निवासस्थानाशी त्यांच्या व कुटुंबीयांच्या अनेक जुन्या आठवणी जुळल्या आहेत.
तेथेच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्मही झाला होता. त्यामुळे या निवास स्थानाबद्दल देसाई कुटुंबीयांत महत्त्वाचे स्थान आहे. हेच निवासस्थान मंत्री शंभूराज देसाई यांना मिळाल्यामुळे ‘मेघदूत’मध्ये ५५ वर्षांनंतर देसाई कुटुंबीयांचे पुनरागमन झाले आहे. या निवासस्थानी यापूर्वी काही वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वास्तव्याला होते.
त्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर ते मंत्री देसाई यांच्याकडे वर्ग केले. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार्य केल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली. त्याबद्दल आभाराचे पत्र देऊन मंत्री देसाई व कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.