पाटण तालुक्यातील बोंद्री गावाजवळ वाहिनीचा खांब पडल्याने २० गावांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

by Team Satara Today | published on : 26 July 2026


कोयनानगर : पाटण तालुक्यातील बोंद्री गावाजवळ ११ के.व्ही. मणदुरे गावठाण वाहिनीचा खांब पडल्याने २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वाहिनीवरील ३५ रोहित्रे बंद असल्याने हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. खांब पडलेल्या ठिकाणी वाहता ओढा असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी काहीशी उसंत घेतली. अनेक दिवसांनंतर दीर्घकाळ सूर्याचे दर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या घटना अद्याप समोर येत आहेत. तोरणे येथील शामराव गंगाराम कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे.

तसेच ११ केव्ही मणदुरे गावठाण वाहिनीचा पोल शुक्रवारी बोंद्री गावाजवळ पडला. त्यामुळे नाथाचीपाग, जाईचीवाडी, मळ्याचावाडा, आंबवणे, धनगरवाडा, बर्गेवाडी, फुरसाई, नाईकडेवाडी, धारेश्वर, मराठवाडी, जवरातवाडी, काटीटेक, जोगेटेक, गावडेवाडी, धुईलवाडी, खुडुपलेवाडी, घाणबी, वाटोळे, काटी, अवसरी आदी गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पोल पडलेल्या ठिकाणी वाहता ओढा असल्याने तेथे नवीन पोल नेण्यासाठी वेळ लागणार आहे. पाचगणी येथे सुरू असलेले काम थांबवून दुरुस्तीचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. - पी. टी. मोहिते, उपकार्यकारी अभियंता, वीजवितरण, पाटण



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा तालुक्यात महामार्गावरील धनगरवाडी हद्दीत मालट्रकला लक्झरी बसने दिलेल्या धडकेत लक्झरीमधील १८ प्रवासी गंभीर जखमी
पुढील बातमी
मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, दिल्लीत जाण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम

संबंधित बातम्या