दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदा का घेत नाहीत?, सध्याचं सरकार लोकांचं, विद्यार्थ्यांचं व पीडितांचं म्हणणं ऐकून का घेत नाही? पंतप्रधान मोदी आणि अमित शाह २० दिवसांपासून सभागृहात का आले नाहीत?’, अशा विविध मुद्यांवरून राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी देश बनला. मात्र, भारताने काय केलं?, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच चीन आणि गलवानच्या मुद्द्यांबाबत बोलताना राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना एक मोठा दावा केला. ‘मला मोदींच्या कार्यालयातून माहिती मिळते’, असं वक्तव्यही राहुल गांधींनी केलं.
“जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोप लागू देणार नाहीत. आम्ही सळो की पळो करून सोडणार”, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“जंतर-मंतरवर जे घडत होतं, ते म्हणजे विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडायची होती. मात्र, विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठीही सरकार नकार देत होतं. सरकार म्हणतंय की आम्ही जंतर-मंतरवर एक विशिष्ट व्यवस्था लागू करणार आहोत. तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकत नाही. थोडक्यात काय तर त्यांचं काम आणि त्यांची राजकीय विचारधारा अशी आहे की भारतावर अशी एक व्यवस्था लादली जावी, त्यामधून त्यांना आणि इतर काही विशिष्ट लोकांनाच फायदा होईल”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
“मी तुम्हाला सांगतो की आमचं काम अगदी सोप्प आहे. आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडणार. नरेंद्र मोदींना रात्री झोप लागत नसेल. याचेही वेगवेगळे कारणं आहेत. आता तुम्ही अमित शाहांना पाहिलं असेल, त्यांना आधी काय म्हणत होते? चाणक्य. मात्र, आता ते कुठे गायब झाले? ते २० दिवस संसद भवनात येऊ शकले नाहीत. का? कारण पहिल्यांदाच त्यांना भारताच्या जनभावनेची जाणीव होत आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
‘जोपर्यंत मोदी राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…’
“काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण विरोधी पक्ष आता आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. ही प्रक्रिया थांबणार नाही. आता धन्यवाद, टाटा, गुडबायची वेळ आली आहे. माझे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाहीत आणि अमित शाह पद सोडत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांनाही शांत झोप लागणार नाही. आम्ही त्यांना कायम जागतं ठेवू. जोपर्यंत ते हार मानत नाहीत आणि कबूल करत नाहीत की, हे आमच्या आवाक्याबाहेरचं आहे. आम्हाला माफ करा आणि आम्हाला जाऊ द्या. आम्ही हा लढा आपल्या देशाची मूल्ये व संस्कृती जपण्यासाठी लढत आहोत. कोणत्याही द्वेषाशिवाय आणि हिंसेशिवाय. आपला देश द्वेषाचा नाही तर स्नेह, प्रेम, बंधुभाव आणि अहिंसेचा आहे हे सिद्ध करून दाखवू”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.