मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने थोडा विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अपवाद वगळता, बहुतांश भागांत उन्हाचे दर्शन झाले. तर काही ठिकाणी हलकासा रिमझिम पाऊस अनुभवायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या उपनगरांसाठी पुढील 24 तासांसाठी कोणताही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.
29 जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये वगळता राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांकरिता जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. 30 जुलैपासून पुढील काही दिवस पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटभागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही निवडक भागांत हलक्या सरी वगळता बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता फिलहाल नाही. सध्या श्रावणातील हलक्याफुलक्या सरी पडत असून, पुढील काही दिवस हवामानात फारसा बदल होण्याची चिन्हे नाहीत.
मराठवाडा भागातूनही पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्यापासून मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र पावसाची तीव्रता पुढेही टिकून राहणार आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.