सातारा : पुसेगाव-फलटण रस्त्यावरील बुध, ता. खटाव, जि. सातारा येथील स्वामी शटर फॅब्रिकेशन दुकानासमोर मोटरसायकल व डंपर याची धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर तिसरी जखमी युवती रविवारी उपचारादरम्यान मृत्यू पावली. हा अपघात शनिवार, दि. १४ रोजी दुपारी २.३० वाजता झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड डंपर (क्र. एम एच ११ डी व्ही ०८१५) वरील चालक दत्तात्रय गुलाबराव वाघ, रा. पुसेगाव, ता. खटाव याने फलटण ते पुसेगाव रोडवर समोरून येणाऱ्या डिस्कव्हर मोटरसायकल (क्र. एम एच ११ ए वाय ६११९) ला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेल्याने शुभम दिलीप मोरे, (वय १९, रा. आमलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा), जय सचिन भोसले (वय १५, रा. वाखरी, ढवळ, ता. फलटण, जि. सातारा) आणि सृष्टी दिलीप मोरे, (वय १७, रा. आमलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना यातील सृष्टी दिलीप मोरे हिचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने आमलेवाडी, गादेवाडी, जाखणगाव परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.