सातारा : राष्ट्रीय बाजार समितीच्या नावाखाली केंद्र सरकार सध्या अस्तित्वात असलेल्या मोठ्या बाजार समित्यांचे अधिकार काढून घेण्याचा डाव आखत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळाऐवजी नामनिर्देशित संचालक मंडळ नेमण्याचा घाट घातला जात असून या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिल्यापासूनच तीव्र विरोध आहे आणि पुढेही राहील, असा ठाम इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी शनिवारी सकाळी दहा वाजता विधान भवनाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय बाजार समिती विधेयकाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या विधेयकाच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.