बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. जसजसा गेम पुढे जातोय, तसं घरातील समीकरणंही बदललेली पाहायला मिळत आहेत. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला खडे बोल सुनावले. पॅडी कांबळेचा अपमान केल्याबद्दल जान्हवीला रितेशने एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. पण, यानंतर मात्र जान्हवीचा अंदाजच बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जान्हवी चक्क निक्की तांबोळीविरोधात लढणार असल्याचं म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओत गार्डन एरियामध्ये जान्हवीबरोबर आर्या बोलत असल्याचं दिसत आहे. आर्या जान्हवीला म्हणते, "मी अरबाजला हे बोलले की आता तुझा निक्कीबरोबर न खेळण्याचा निर्णय झाला आहे. जो तुझा काल परवापर्यंत झाला नव्हता. आता तुझी खरी पर्सनालिटी दिसून येईल". त्यावर जान्हवी आर्याला म्हणते, "माझा गेम एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या विरोधात कचाकचा भांडू शकते".
जान्हवीचं हे बोलणं ऐकल्यावर आर्या "आज मी निक्कीला हे तोंडावर बोलले की तिला तुझी सावली म्हणतात कारण ती तशीच आहे. जान्हवी काय आहे, हे तुझ्या अॅक्शन्समुळे लोकांना आता कळेल. आणि सगळ्यांना तेच पाहायचं आहे", असं म्हणते.
भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केली होती. त्यानंतर निक्कीने "टीम A मधील सदस्यांना मी ट्रॉफी उचलून देणार नाही", असं म्हटलं होतं. त्यानंतर घरातील समीकरणं पुन्हा बदलल्याचं पाहायला मिळालं. आता जान्हवीच्या या वक्तव्यानंतर घरात आणखी नवीन काय पाहायला मिळणार, हे बघावं लागेल. दरम्यान, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले यांच्यानंतर इरिना रुडाकोवाचा घरातील प्रवास संपला आहे.