सातारा : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक व कलासंपन्न ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले ‘श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालया’च्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी आणि आधुनिक विकासासाठी तब्बल 52 कोटी 66 लाख 66 हजार 853 रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे औंध आणि आसपासच्या भागातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
औंधचे ‘श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय’ हे भारतातील पहिले स्वतंत्र संग्रहालय मानले जाते, जे खासगी संस्थेमार्फत स्थापन झाले आहे. हे संग्रहालय प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रही असलेल्या अत्यंत दुर्मिळ कलाकृतींसाठी ओळखले जाते. येथे रवींद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच्यासह अनेक भारतीय आणि युरोपियन कलाकारांची मौल्यवान चित्रे व कलाकृती संग्रहित आहेत. त्यामुळेच या संग्रहालयास भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते.
या संग्रालयाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने नुकताच यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार ‘श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालया’च्या संपूर्ण आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे ठेव अंशदान स्वरूपात ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या संग्रहालयाची इमारत बळकट करण्यात येणार आहे. अद्यायावत दालन उभारणी व कलाकृतींचे संवर्धन करणे, पर्यटकांसाठी सुविधा, लायब्ररीचे आधुनिकीकरण तसेच पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना तसेच इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे संग्रहालयाचा दर्जा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावला जाणार आहे.
संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांना या कामासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून ते किंवा त्यांच्याकडून अधिकृत प्रतिनिधी संबंधित देयकांवर स्वाक्षरी करू शकतील.
‘श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालया’च्या कामामुळे औंध व आजूबाजूच्या भागातील युवकांना पर्यटन मार्गदर्शक, संग्रहालय सहाय्यक, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक अशा विविध क्षेत्रांत रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. तसेच स्थानिक उद्योजक, हॉटेल्स आणि वाहतूक व्यवसायिक यांनाही या पर्यटनाचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. ’श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालया’चे हे नवे रूप औंधच्या सांस्कृतिक ओळखीला नवी झळाळी देणार आहे.
शासनाच्या या पुढाकारामुळे कला व इतिहासप्रेमींसाठी औंध एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून अधिक ठळकपणे उभे राहील यात शंका नाही.
औंध हे सातार्याच्या सांस्कृतिक वैभवाचे द्योतक आहे. भवानी चित्रसंग्रहालय हे केवळ औंध नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कला, संस्कृती आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. संग्रहालयातील अमूल्य चित्रे, शिल्पकृती व ऐतिहासिक वास्तू यांचे जतन व संवर्धन अधिक प्रभावीपणे केले जाईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना अद्भुत अनुभव देण्याची योजना आहे. हे काम पारदर्शकतेने आणि गुणवत्तापूर्ण केले जाईल.
संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा