सातारा : जिल्ह्यातील कराड शहर परिसरातील सातत्याने शरीराविरुद्ध गुन्हे करणार्या सराईत टोळीचा प्रमुख गणेश शिवाजी काटकर (वय 24) रा.मंगळवार पेठ, कराड व त्याचा साथीदार प्रसाद उर्फ बाबू आनंद कुलकर्णी (वय 27) रा. मंगळवार पेठ, कराड या दोघांना तीन महिन्यांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित दोघांवर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करून दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी मारामारी करणे, घरफोडी, चोरी करणे, दंगल करणे यांसारख्या दखलपात्र स्वरूपाच्या केसेस दाखल आहेत. त्यानुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी आर.ए. ताशिलदार यांनी या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा, सांगली जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केली होती. त्यांच्यावर वेळोवेळी अटक करून प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे कराड तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात असल्याने पोलीस अधीक्षक दोशी यांनी त्यांना तीन महिन्यासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार केले आहे.