सातारा : रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे कृतिशील वारसदार पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांचा 52 वा पुण्यतिथी समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवार दि.17 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे दु. 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांना 2025 चा पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उल्हास पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये एक लाख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दिली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उल्हास पवार उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तीस संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
या कार्यक्रमास सातारा शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन विकास देशमुख यांनी केले आहे.