कवठेमहांकाळ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून समाजाच्या नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. मराठा समाजाने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ येथील शिंदे पॅलेस, नरघोल रोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते.
जरांगे-पाटील यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. मराठा समाजाच्या नोंदी रद्द झाल्या, कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार किंवा अपलोड केलेल्या कागदपत्रांवर कारवाई होणार अशा प्रकारच्या चर्चा मुद्दाम पसरविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा अफवांमुळे समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून मराठा समाजाने त्याला बळी पडू नये, असे ते म्हणाले.
..त्याचे गंभीर परिणाम होतील
अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच निर्णय घ्यावेत. केवळ राजकीय आदेशांवर किंवा दबावाखाली समाजाच्या नोंदी व प्रमाणपत्रांबाबत कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला.
न्याय्य हक्कांसाठी संघर्ष तीव्र करणार
यावेळी त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा शेवटपर्यंत सुरू राहणार असून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सभेला तालुक्यासह परिसरातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रदीप सोळंके, रमेश कोळेकर, अनिल लोंढे, हिंमत पाटील, लालासाहेब वाघमारे, सुरज पाटील आणि संभाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त करून मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविला.