रानडुकराच्या शिकारीप्रकरणी फलटणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई

चार जण जेरबंद : आरोपींना एक दिवसाची वनकोठडी

by Team Satara Today | published on : 02 August 2026


सातारा : फलटण तालुक्यातील आदकी खुर्द परिसरात रानडुकराची बेकायदा शिकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविभागाने नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली. गुरुवार दि. 30 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी वनरक्षक आदकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रथम वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोमनाथ बाळू भंडलकर (50), अतुल रमेश जाधव (20), विक्रम संतोष डोंबाळे (24) आणि गणेश लक्ष्मण जाधव (25), सर्व रा. आदकी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा यांचा समावेश आहे.

कारवाईनंतर आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची वनकोठडी सुनावली. 

तपासादरम्यान आरोपींकडून तीन मोबाईल फोन, एमएच-11-बीयू-4585 क्रमांकाची टीव्हीएस मोटारसायकल तसेच अन्य संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वनविभागाने नागरिकांना इशारा देताना सांगितले की, वन्यप्राण्यांची शिकार, त्यांची अवैध वाहतूक, बेकायदा वृक्षतोड किंवा राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत अशा गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे अशा बेकायदा प्रकारांची माहिती तातडीने वनविभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही संयुक्त कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर, वनपाल महादेव पाटील, वनरक्षक सुरज इनकर, विशाल शिंदे आणि फलटण वनपरिक्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या