वडूज : आगामी काळात खटाव-माणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत संघटनात्मक बांधणी केली जाणार असून, वडूज व दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी केली.
वडूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शेखरभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अतुल पवार, पांडुरंग झगडे, नितीन शिंदे, सागर गुरव, गणेश चव्हाण, विकास कुदळे, धनाजी गोडसे, भाऊसाहेब खाडे, नामदेव खाडे व शैलेश देवकर उपस्थित होते.
शेखर गोरे म्हणाले, सातारा जिल्हा हा पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेची ताकद वाढवणे आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या-नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ घालून नव्याने संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. पक्षासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा व तालुका कार्यकारिणीत योग्य जबाबदारी दिली जाईल. वडूज आणि दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्यात येतील. जनतेत काम करणाऱ्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकद दिली जाईल. निवडणुका आणि पक्षाच्या कामकाजात सर्वसामान्य जनतेचे हित सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात आगामी काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही शेखर गोरे यांनी दिला. तसेच मंत्री जयकुमार गोरे यांची एकाधिकारशाही कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
वडूज, दहिवडी नगरपंचायती ताकदीने लढवणार - शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांची घोषणा, वडूज येथे पत्रकारांशी संवाद
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा