समता आश्रमशाळेतील शिक्षक भरतीची जाहिरात रद्द; शासनाची परवानगी नसल्याचेइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्पष्टीकरण

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात अनुदानित तत्त्वावर स्वयंसेवी संस्थांमार्फत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा ३३ आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनामार्फत अदा केले जाते. त्यामुळे आश्रमशाळांच्या मान्यता व पदभरतीबाबतचे सर्व अधिकार शासनाकडे राखीव असून पदभरती करण्यापूर्वी शासनाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था, पुणे या संस्थेने समता प्राथमिक आश्रमशाळा पाडेगाव (ता. खंडाळा) येथे शिक्षक पदभरतीसंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र ही जाहिरात शासनाची परवानगी न घेता प्रसिद्ध करण्यात आल्याने ती नियमबाह्य असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

शासन निर्णय दि. ३ डिसेंबर २०२५ नुसार शिक्षक भरती Pavitra Portal (पवित्र पोर्टल) द्वारेच करणे अनिवार्य आहे. पवित्र प्रणालीव्दारे शिक्षण सेवक भरती न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना संबंधित रिक्त पदाचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, अशी तरतूद शासनाने केली आहे.

त्यामुळे संबंधित संस्थेने वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली शिक्षक भरतीची जाहिरात रद्द समजावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा येथील सहाय्यक संचालक सुजीत बर्गे यांनी जाहीर प्रकटणाद्वारे केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
पुढील बातमी
'त्या दरवाजाआड' कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळा संपन्न; मान्यवरांच्या उपस्थितीत कथासंग्रहावर चर्चा

संबंधित बातम्या