सातारच्या 'व्याधी' मुळापासून संपवण्यासाठी डॉ. संदीप काटे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

by Team Satara Today | published on : 11 November 2025


सातारा : सद्य परिस्थितीत अनेक वर्षानंतर सातारा पालिकेची निवडणूक होत आहे. एकमेकांच्या विरोधात कट्टरपणे निवडणुका लढवणाऱ्या सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी आज गळ्यात गळे घालू लागले आहेत. मनोमिलनाचा सूर जुळला असून 'तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्याच्या माळा' असे सूर आता कानावर पडत असून नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण जलमंदिरासह सुरूचीवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सातारा विकास आघाडीसह नगर विकास आघाडीकडून अद्यापही सातारच्या नगराध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी सातारच्या लोकांचा थेट नगराध्यक्ष म्हणून सातारा शहरातील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक तथा सातारा हिल मॅरेथॉनचे जनक डॉ. संदीप काटे यांचे नाव तिसऱ्या आघाडीकडून पुढे येऊ लागले आहे. सातारच्या विकासकामा संबंधीच्या 'व्याधी' मुळापासून संपवण्यासाठी डॉ. संदीप काटे हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा शहराची सुधारित खेडे म्हणून बाहेर गावात अवहेलना केली जाते. पुणे, सांगली, कोल्हापूर ही शहरे विकासाच्या बाबतीत कोठे? आणि सातारा शहर कोठे? याचा विचारच न केलेलाच बरा.  ना इंडस्ट्रियल हब, ना  पर्यटन हब अशी सातारा शहराची अवस्था झाली आहे. सातारा  जिल्ह्याचे मुख्यालय समजल्या जाणाऱ्या सातारा शहरात रस्ते, बंदिस्त गटर, खेळांची मैदानी यांची वाणवा आहे. एकेकाळी उद्योगांनी बहरलेल्या एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेल्यामुळे आज सातारा येथील उद्योग क्षेत्राला ग्रहण लागले आहे. रोजगाराअभावी असंख्य तरुणांची ससेहोलपट होत आहे. सातारा शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने नैसर्गिक साधन संपत्ती दिली आहे. शहराच्या जवळ अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, कास पठार, बामणोली, ठोसेघर ही प्रसिद्ध ठिकाणी असतानाही शहरांमध्ये आजपर्यंत 'टुरिझम हब' विकसित केला गेला नाही. टुरिझम हबसह इंडस्ट्रियल हब विकसित करण्यावर भर दिला तर जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. सातारा शहराला बकाल शहर न ठेवता त्याचा विकास करायचा असेल तर पारंपारिक सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. संदीप काटे हेच एकमेव पर्याय ठरतील अशी चर्चा शहरात होऊ लागली आहे.

सातारा शहरात दोन महाराज, कंदी पेढा सोडल्यास जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही साताऱ्याची अशी कोणतीच ओळख नव्हती मात्र एका तपापूर्वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा सुरू करून डॉ. संदीप काटे यांनी राज्य, देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातारा शहराचे नाव प्रकाशझोतात आणले. या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी देश विदेशातील हजारो खेळाडू,पर्यटक सातारा शहरात धावण्यासाठी येत असतात मात्र शहरातील विविध सुविधांची वानवा पाहता त्यांनाही शरमेने मान खाली घालावी लागत आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सातारा शहराची सुधारित खेडे म्हणून अवहेलना केली जाते. आज पुणे, सांगली कोल्हापूर ही शहरे विकासाच्या बाबतीत कुठे? आणि सातारा शहर कुठे? याचा विचार न के लेलाच बरा.  पाच वर्षातून एकदा नगरपालिका निवडणूक होत असते. सातारा शहराच्या विकासाबाबत आणा-भाका घेतल्या जातात मात्र सातारा शहर खड्ड्यातच राहते हा एक इतिहास आहे. एखाद्या शहराचा विकास कसा असतो हे पाहण्यासाठी शहरातील रस्ते कसे आहेत यावर ते अवलंबून असते. डॉ. संदीप काटे यांच्या रूपाने सातारा शहराला पुढे ५० वर्ष नेणारा एक चेहरा सापडला आहे. मॅरेथॉनच्या निमित्ताने धावण्यासाठी ते जगभर फिरत असतात. त्यांनी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन ही ८७  किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा लिलया पूर्ण केली आहे. जगभरात फिरत असताना ते साताऱ्यात जेव्हा येतात तेव्हा सातारा शहरातील विकास कामांची वाणवा पाहून ते दुःखी होतात. हे ते अनेकदा जाणीवपूर्वक बोलून दाखवतात. केवळ राजकीय अनास्थेमुळे सातारा शहराचा विकास होत नाही. अशी खंतही त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

सातारा शहर ही छत्रपती घराण्याची राजधानी मानली जाते मात्र असे असूनही सातारा येथील पोवई नाक्यावर उभा असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्याच कर्तव्याला साजेसा नसल्याने मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सातारा शहरात प्रवेश करतानाच त्यांचा पुतळा दिसावा म्हणजेच अजिंक्यताऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करून आम्ही छत्रपतींच्या राजधानीमध्ये प्रवेश करतोय अशी जाणीव प्रत्येकाला होईल. असा मानस त्यांनी व्यक्त केला.

सातारा शहरातील रस्ते बंदिस्त गटार योजना खरच आहे कि, नाही ? हा जरी संशोधनाचा विषय असला तरी, येणाऱ्या काळात विकास कामात टक्केवारी हा शब्द विकासाच्या डिक्शनरीमधून काढणार असल्याचा माणस डॉ. संदीप काटे यांनी यावेळी व्यक्त केला. ते शल्य चिकित्सक म्हणजे मुळव्याधी तज्ञ आहेत. सातारा शहराच्या विकासाच्या काही 'व्याधी' आहेत हे त्यांना चांगलेच माहित आहे. त्या संपवण्यासाठी ते नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे सातारकर जनता सुखावली असून ते थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे राहिल्यास त्यांच्या विरोधी उमेदवाराची अनामत रक्कम शिल्लक राहणार नाही. असा 'मानस'  सातारकर मतदारांनी व्यक्त केला आहे.


सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेमुळे सातारकरांची प्रकृती सुदृढ

गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहरात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा होत असून त्यामध्ये राज्य, देश-विदेशासह सातारा जिल्ह्यातील अनेक युवक- युवती सहभागी होत असतात. या मॅरेथॉनमुळे धावण्याचा फायदा काय आहे हे समजण्यास मदत झाली असून या स्पर्धेत मुळेच आज जिल्ह्यातील  हजारो लोकांची तसेच युवक युवतींची प्रकृती सुदृढ राहण्यास मदत झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीरजवान शेखर जगदाळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उकिर्डे गावासह माण तालुक्यावर शोककळा
पुढील बातमी
राजधानी साताऱ्यात 'मनमे फुटे लड्डू....! पालिका निवडणुकीत दोन्हीही राजांचे अखेर मनोमीलन अभेद्य

संबंधित बातम्या