सातारा : साताऱ्यात सुरू असलेले मनोमिलनाचे हेलकावे अखेर सोमवारी संपले. मुलाखती रात्री उशिरा संपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट सुरूचीवर जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा दोन्ही राजांचे मनोमिलन होऊन नगरपालिका एकत्र लढल्या जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. इच्छुकांच्या मुलाखतीचा खलिता घेऊन शिवेंद्रसिंहराजे मंगळवारी मुंबईला रवाना होत आहेत. त्यापूर्वी दोन्ही राजांची झालेली बैठक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज फर्न हॉटेल येथे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. प्रत्येकाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. या घडामोडीत खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री उशिरा सुरुची बंगल्यावर जाऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दोन्ही आघाड्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगत मनोमिलनावर शिक्कामोर्तब केला. यावेळी दोघांच्यात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. यादरम्यान दोन्ही आघाडीचे इच्छुक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत नगरसेवकांनी सुद्धा यामध्ये मुलाखती दिल्या. निवडणूक प्रमुख म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या मुलाखतींचा सारांश खलिता घेऊन शिवेंद्रसिंहराजे मंगळवारी मुंबईला रवाना होत आहेत. तत्पूर्वी दोन्ही मार्गाने एकमेकांची भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुंबईवरून आल्यानंतर पुन्हा दोन्ही महाराजांची महत्त्वाची बैठक होण्याची चिन्हे आहेत.