सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ तथा रामजी आंबेडकर हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जलसंधारण विभागाच्या अधिकारी पल्लवी ताकसांडे होत्या.
प्रथमतः पुतळ्यास ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धम्मबांधव उत्सव समितीचे अध्यक्ष विकास तोडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इंजि.रमेश इंजे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी गायनाबरोबर आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष अरविंद गाडे, विजय गायकवाड, माजी प्राचार्य प्रकाश रणबागले व रमेश जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, सचिव बी.एल.माने, डी.एस.भोसले, ऍड.विलास वहागावकर, ऍड. हौसेराव धुमाळ, दिलीप कांबळे, अशोक कांबळे, सुखदेव घोडके, पी.टी.कांबळे, अंकुश धाइंजे, वामन मस्के, जयश्री कांबळे, पांडुरंग कांबळे, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या होत्या. "भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामीतुन बाहेर काढावे." अशी रामजी आंबेडकरांची इच्छा होती. रामजींचे वडील मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते. मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते. ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.