सातारा : भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीने सर्व सदस्यांचे पसंतीक्रम जाणून घेत धक्कातंत्र तर वापरलेच, शिवाय जिल्ह्यात भाजपच्या बांधणीच्या अनुषंगाने राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. या निवडीने कराडमध्ये अतुल भोसले यांच्या समर्थकांनी एकच आनंद साजरा केला आहे.
जिल्हाध्यक्ष निवडणुकीचे प्रभारी आमदार चैनसुख संचेती यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाच जिल्ह्यांना दोन जिल्हाध्यक्ष देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याला मात्र भोसले यांच्या रूपाने एकमेव जिल्हाध्यक्ष लाभला आहे. सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी विद्यमान खासदार व आमदार यांनी राजकीय मोर्चेबांधणी केली होती. या पदासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे समर्थक सुनील काटकर यांच्यासाठी व मावळते जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती. याशिवाय कराड उत्तरचे भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांसह विविध नावे चर्चेत होती. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील या निवडी काही काळ लांबणीवर पडल्या होत्या. मात्र तणावग्रस्त परिस्थिती निवळल्यानंतर लगेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीने या निवडी जाहीर केल्या.
निवडणूक प्रभारी संचेती यांनी या निवडी जाहीर केल्या. सातारा जिल्ह्यामध्ये डॉ. अतुल भोसले यांच्या नावाची कुठेही जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चा नव्हती. या सर्व चर्चेतील नावांना बाजूला ठेवत डॉ. अतुल भोसले यांच्या नावा वर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामागे कोणते पसंतीक्रम पाठवले गेले, कोणाच्या नावाला पसंती मिळाली, हा सगळा दस्तऐवजातला गोपनीय भाग आहे.
डॉ. अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तब्बल दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवणे आणि मजबूत करणे यासाठी त्यांनी कराड दक्षिण मध्ये जिवाचे रान केले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कराड दक्षिणचे कॉंग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे अतुल भोसले यांच्या निमित्ताने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीने मजबूत पाया तयार केला. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना पक्षात समाविष्ट करून लोकसभा विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. त्याकरिताच भोसले यांची निवड करण्यात आली होती. डॉ. भोसले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणूनही चांगल्या कामाची नोंद केली.
अतुल भोसले हे भाजपचे आमदार असून ते अशा कुटुंबातून आले आहेत, ज्यांचा सहकारी क्षेत्रातही मोठा प्रभाव आहे. त्यांचे आजोबा जयवंत भोसले हे एक प्रसिद्ध सहकारी उद्योगपती होते. कृष्णा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर लिमिटेड, कृष्णा सहकारी बँक अशा माध्यमातून सहकार क्षेत्रातही त्यांचे मजबूत जाळे आहे. त्यांच्या कुटुंबाकडे अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. जयवंत भोसले यांनी कृष्णा विश्वविद्यापीठाची स्थापना केली, जे एक अभिमत विद्यापीठ आहे. अतुल भोसले यांचे वडील सुरेश भोसले हे कराडमध्ये 1125 खाटांचे आधुनिक रुग्णालय असलेल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. डॉ. भोसले यांच्या मागे सहकार उद्योग शिक्षण या परंपरेची मोठी पार्श्वभूमी असून भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी चमकदार कामगिरी नोंदवली आहे.
जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेसाठी सातारा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात जोरदार चुरस होती. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर यांचे पारडे जड होते. मावळते जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सुद्धा फेरनिवडीसाठी मोर्चेबांधणी करून ठेवली होती. मात्र प्रदेश कार्यकारिणीने आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड करत प्रादेशिक समतोल साधला आहे. चार कॅबिनेट मंत्र्यांच्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कराड दक्षिण ला न्याय मिळणे क्रमप्राप्त होते. कराड उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे मजबुतीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतुल भोसले यांची निवड केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दरम्यान प्रतिक्रियांसाठी डॉ. अतुल भोसले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मुंबई दौर्यावर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.