सातारा: सांगली–सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह खाशाबा जाधव (जगताप) यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. धैर्यशील कदम यांनी पहिल्याच पसंतीच्या मतमोजणीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा सहज पार करत तब्बल ३०१ मतांची मोठी आघाडी घेतली आणि सांगली-सातारा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम राखले.
अधिकृत मतमोजणीच्या निकालानुसार, या निवडणुकीत एकूण ८८५ वैध मते पडली होती. त्यापैकी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीच्या रिंगणात असलेले तिसरे अपक्ष उमेदवार किशोर हणमंत धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही. या निवडणुकीत विजयासाठी ४४३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता, जो धैर्यशील कदम यांनी पहिल्याच फेरीत पार केला.
धैर्यशील कदम यांच्या या मोठ्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोटात जोरदार जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी केली, तसेच जोरदार घोषणाबाजी आणि गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. या लक्षवेधी निकालामुळे सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपली राजकीय पकड मजबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले असून, हा निकाल महाविकास आघाडीसाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.