सातारा : अनिल देसाई सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून माण-खटावला सरकारच्या माध्यमातून सहकार्य करून देसाईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते दहिवडी येथील आयोजित अनिल देसाई यांच्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, सुरेंद्र गुदगे, उदयसिंह उंडाळकर पाटील, बाळासाहेब सोळस्कर, संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान, नितीन भरगुडे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, सीमाताई जाधव, आ. सचिन पाटील, प्रदीप विधाते, जितेंद्र पवार, इत्यादी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, माण तालुक्याचे चित्र काही वर्षापूर्वी वेगळे होते. आज तालुक्याचे रूप बदलले आहे. अनिल देसाई हा माण तालुक्याच्या मातीशी नाळ जोडलेला आणि सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेला नेता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पक्ष बळकटीकरण करण्यास मदत करावी. आमचा पक्ष आणि सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी कायमच उभा राहणारा आहे.
अनिल देसाई म्हणाले, गेली २४ वर्ष झाली जिल्हा बँक आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा करतोय. माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी तलावात २०१८ साली पहिल्यांदा पाणी आणले. टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवल्याशिवाय गप्प बसणार नाही. येथील लोकप्रतिनिधी गेली १७ वर्ष झाले उरमोडीच्या पाण्यावर निवडणुका जिंकतात आणि आतापर्यंत जनतेच्या बांधापर्यंत पाणी पोहचले नाही. आजपर्यंत येथील जनतेची फसवणूक केली आहे. माझे पवार कुटुंबावर पहिल्यापासूनच प्रेम आहे आणि कायमच राहील, हा माझा शब्द आहे. या मतदार संघातील जनता दबावाखाली वावरत आहे. प्रशासनाला हाताशी धरून जनतेला वेठीस धरले जात आहे. विरोधकांना खोट्या कायद्याच्या बेडीत अडकवले जात आहे. जनता भयभीत झाली आहे. मी आतापर्यंत माण-खटावच्या कोणत्याही जनतेवर कधी अन्याय केला नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक युवकांना सक्षम करण्याचे काम केले. येथील जनतेला न्याय देण्यासाठी अजितदादा तुम्ही फक्त पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा. पुन्हा हा तालुका सुरळीत पदावर आणेन, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, अनिल देसाई राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये वाढलेला नेता आहे. त्यांचे हात बळकट करा. पुन्हा या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल आणि आमच्या पाठीशी अजितदादा आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याला सोडणार नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, दडपशाही आम्ही चालू देणार नाही. मी आतापर्यंत उच्चांकी मताने आमदार झालो आहे. येथील लोकप्रतिनिधी किती मताने निवडून येतात, हे जिल्ह्याला चांगले माहिती आहे. या तालुक्याचे नेतृत्व स्व.सदाशिव पोळ तात्यांनी केले आहे. त्यामुळे मनोज पोळ आणि अनिल देसाई यांनी हातात हात घालून काम करावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता आणा आणि हा मतदारसंघ बळकट करा, असे वक्तव्य त्यांनी केले.
बाळासाहेब सोळसकर बोलताना म्हणाले, अनिल देसाई हे जिद्दीने काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून माण खटावच्या राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला हातात हात घालून काम करा. पुन्हा बाल्लेकिल्ला तयार झाल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
मी वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघातून २-३ हजार मताने निवडून येत नाही. उच्चांकी मताने विजयी होतो. तुम्ही किती मताने निवडून येता हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. येथील दडपशाही, गुंडगिरी आता मोडीत काढू. येथून पुढे जनतेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही मंत्री मकरंद पाटील यांनी दिला आहे.