रहिमतपुरातील घरफोडीचा छडा; 16.51 लाखांचे सोने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा व रहिमतपुर पोलिसांची संयुक्त कारवाई

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : रहिमतपुर परिसरात घरफोडी करून तब्बल 12 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या संशयिताचा स्थानिक गुन्हे शाखा आणि रहिमतपुर पोलिसांनी संयुक्त तपासातून छडा लावला. संशयिताकडून चोरीस गेलेले 12 तोळे 1 ग्रॅम 820 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 16 लाख 51 हजार 791 रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
रहिमतपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 ऑक्टोबर रोजी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीची घटना गंभीर असल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि रहिमतपुर पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच घटनास्थळी उपलब्ध झालेल्या भौतिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीच्या सुरुवातीला संशयिताने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी उपलब्ध पुरावे समोर ठेवून कसून चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके आणि रहिमतपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या पथकाने केली. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, एम. एम. खान यांच्यासह  स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.हवा. अमित सपकाळ, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार तसेच रहिमतपुर पोलीस ठाणेकडील पो.हवा. प्रविण बर्ग, पो.कॉ. तुषार काळंगे, पो. कॉ. अमर भोसले, पो.ना. सुशांत शिंदे, पो. कॉ. विनोद मोरे, पो.कॉ. समाधान देशमुख, म. पो. हवा. शितल सानप, म.पो.कॉ. अश्‍विनी घाडगे यांनी सहभाग घेतला. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सात दिग्गजांच्या उमेदवारीवर कायदेशीर ‘ब्रेक’ची शक्यता; जिल्हा बँक निवडणुकीच्या छाननीत हरकतींची सरबत्ती; निर्णय राखून ठेवल्याने राजकीय गणिते पुन्हा ढवळली
पुढील बातमी
भैरवनाथ देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? कॉंक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; कामाची तांत्रिक चौकशी, ठेकेदारावर कारवाईची नगराध्यक्षांकडे मागणी

संबंधित बातम्या