कास पठारावर पिवळ्या फुलांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात

by Team Satara Today | published on : 13 October 2025


बामणोली : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा मुख्य हंगाम अजून पंधरा दिवस सुरू राहणार आहे. यंदा नोव्हेंबरपर्यंत हा हंगाम राहणार असल्याने दिवाळीत कासवर पर्यटकांची रीघ लागणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत पठारावर मिकी माऊस या पिवळ्या फुलांचा बहर पाहायला मिळत असून, जणू काय संपूर्ण पठार पिवळे धमक दिसत आहे. दरम्यान, कासवर रविवारी पर्यटकांची गर्दी होती. 

कास पठारावरील फुलांची नजाकत पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी कायम आहे. विकेंडला पठारावर मोठी गर्दी होत आहे. पठारावर सध्या पिवळ्या फुलांचा साज पहावयास मिळत आहे. खास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम हा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाला मात्र कायमस्वरूपी पडत असणाऱ्या पावसामुळे हा हंगाम वाढला असून अजून पंधरा दिवस हा हंगाम असाच सुरू राहणार आहे. तेरड्याच्या गुलाबी फुलांपासून सुरू झालेला हा हंगाम वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांनी भरून गेला होता. तो आता अंतिम टप्प्यामध्ये मिकी माऊस या पिवळ्या फुलांनी आता भरून गेला आहे.

यावर्षी राजमार्ग ते कुमुदिनी तलाव या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांनादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून, राजमार्गावर या इलेक्ट्रिक गाड्यांमधून ये-जा करण्यासाठी पर्यटक रांगाच्या रांगा लावत आहेत. मात्र, कडक उन्हामुळे पर्यटकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. पठार ते कुमुदिनी तलाव या दोन कि.मी. अंतरासाठी पर्यटकांना पन्नास रुपये जाण्यासाठी व पन्नास रुपये परत येण्यासाठी शुल्क आकारले जाते. मात्र, याच वर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांची सोय केल्याने इलेक्ट्रिक वाहनांना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहस्रचंडी यागाच्या महाप्रसादासाठी हजारो सातारकर भक्तांची उपस्थिती
पुढील बातमी
राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध: उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित बातम्या