सरस्वती विद्यामंदिरच्या श्रीशा जाधवची तीन सुवर्णपदकांना गवसणी

विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत कराडच्या खेळाडूचे निर्विवाद वर्चस्व; विरार येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

by Team Satara Today | published on : 28 October 2026


कराड : विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरची राष्ट्रीय खेळाडू कु. श्रीशा सागर जाधव हिने उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके पटकावली. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे तिची विरार येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोल्हापूर येथे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रीशाने कमालीची चिकाटी आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन करत २००० मीटर रोड रेस, १००० मीटर रिंक रेस आणि ५०० मीटर रिंक रेस या तिन्ही प्रकारांत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम क्रमांक मिळवला. एकाच स्पर्धेत तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावत तिने स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
श्रीशाला या यशासाठी राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नियमित सराव, शिस्त आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर तिने हे घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल योगेश स्केटिंग ॲकॅडमीतील सर्व खेळाडू व पालकांनी आनंद व्यक्त करत पुढील स्पर्धेसाठी विश्वास दाखवला. तसेच तीन सुवर्णपदकांची लखलखती कमाई करणाऱ्या श्रीशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, जनकल्याण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संस्थेचे विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये भेसळयुक्त खव्याप्रकरणी ‘बालाजी स्वीट्स’ व ‘गनबोटे मिल्क प्रॉडक्ट्स’ला दीड लाखांचा दंड

संबंधित बातम्या