विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

पळशी येथे आईला वाचवताना घडली दुर्देवी घटना

by Team Satara Today | published on : 12 May 2025


सातारा : कोरेगाव तालुक्यातील पळशी येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिक मोटार बंद करण्यास गेलेल्या अर्चना यांना विजेचा झटका बसला. त्याच दरम्यान, त्यांची मुलगी गायत्री हिने वीजपुरवठा बंद न करता हातातील वायर ओढल्याने तिलाही विजेचा शॉक बसला. दोघी गंभीर जखमी झाल्याने कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले, उपचारापूर्वी गायत्रीचा मृत्यू झाला. आई अर्चनावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पळशी येथे अर्चना सोमनाथ भंडलकर या घराच्या पाठीमागे असलेल्या नळाचे पाणी भरत होत्या. त्यासाठी त्यांनी विजेची मोटर लावली होती. पाणी भरून झाल्यानंतर अर्चना या मोटर बंद करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना विजेचा झटका बसला. त्या जोरात ओरडल्याने त्यांची मुलगी गायत्री ही पळत गेली. वीजपुरवठा बंद न करता, तिने आईच्या हातातील वायर ओढली. त्यात तिलाही शॉक बसला आणि ती ओरडून खाली पडली.

सोमनाथ भंडलकर हे जोरात ओरडल्याचा आवाज ऐकून नळाजवळ आले आणि त्यांनी तातडीने शेजारी राहावयास असलेल्या सुरेश पिसाळ यांच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनातून दोघींना कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, मुलगी गायत्री हिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगितले, तर अर्चना गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले.

गायत्री भंडलकर हिने दहावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले असून, अवघ्या दोनच दिवसांपूर्वी तिचा निकाल जाहीर झाला होता. तिचे सर्वत्र कौतुक होत असतानाच अचानक विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात संतोष भंडलकर यांनी फिर्याद दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आनेवाडी टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर लूटमारीचे प्रकार
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या