विश्वास पाटील यांच्या बंधूकडून साहित्य महामंडळाचा निषेध

विश्वास पाटील हा थापाड्या माणूस ; बंधू सुरेश पाटील यांचा पत्रकार परिषदेत थेट भडिमार

by Team Satara Today | published on : 23 September 2025


सातारा :  विश्वास पाटील हा थापाड्या माणूस असा थेट भडिमार करत, त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीस त्यांचेच साहित्यिक असलेले बंधू सुरेश पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. अशा बोगस व बंडलबाज माणसाची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आपण साहित्य महामंडळाचा जाहीर निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.

पानिपत, झाडाझडती, पांगिरा, महानायक, संभाजी त्याचप्रमाणे महासम्राट अशा अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या पानिपतकार विश्वास पाटील यांची नुकतीच ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र लगेचच त्यांच्या निवडीबद्दल विरोधाचे सूर सुरू झाले आहेत. अशातच आता खुद्द त्यांचे बंधू सुरेश पाटील यांनीही विश्वास पाटील यांच्या विरोधात शस्त्र परजले आहे.

यावेळी प्रागतिक साहित्य समितीचे शिवाजी राऊत, चंद्रकांत खंडाईत यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत निवडीबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला

आज सातारा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विश्वास पाटील यांच्या संमेलनाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. विश्वास पाटील हा थापाड्या माणूस आहे. त्यांच्या साहित्यात अशा अनेक थापा मारल्या आहेत. अशा बोगस आणि बंडलबाज माणसाची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आपण साहित्य महामंडळाचा जाहीर निषेध करत आहोत असे उद्गार त्यांनी काढले.

.. त्यामुळे हा सर्व विषय उघडा करण्याची वेळ आली

विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीमधून थापा मारल्या आहेत. अनेक साहित्यिक थापा त्यांनी अशाच पचवल्या आहेत. वास्तविक संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले होते. मात्र आम्हालाच त्यांनी वारणाकाठचे उंदीर अशी उपमा दिली. त्यामुळे हा सर्व विषय उघडा करण्याची वेळ आली आहे. आमच्यात कोणताही भाऊबंदकीचा वाद नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीही असुया नाही. मी पाय ओढणारा खेकडाही नाही. खरे तर विश्वास पाटील हेच खरे बोगस साहित्यिक आहे. त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी बेजबाबदार लिखाण केले आहे. वस्तुस्थितीशी संबंध नसणारे त्यांचे लिखाण आहे. त्यांनी अनेक साहित्यिक थापा मारल्या आहेत अशी परखड टीका त्यांनी केली.

आरक्षणाच्या अनुषंगाने मध्यंतरी विश्वास पाटील यांनी केलेले वादग्रस्त विधान हे त्यांनी मराठा समाजात आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी जाणीवपूर्वकच केले असावे, अशी टिप्पणीही सुरेश पाटील यांनी केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या अभ्यासिकातील पहिला विद्यार्थी राज्य राखीव पोलीस दलात
पुढील बातमी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडण्यापूर्वी गावे पूर्णपणे रिकामी करा

संबंधित बातम्या