पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात अडथळा प्रकरणी चार जणांवर गुन्हा

आणखी काही जण रडारवर; जेसीबीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : सातारा नगरपालिकेच्या गुरुवार परज येथील मोकळ्या जागेत पालिकेच्यावतीने शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम सुरु असताना सातारा पालिकेचे हे काम होवूच द्यायचे नाही. याकरता शाळेचे मैदान वाचवा अशी अजब मागणी करत शहर सुधार समितीच्या नावाने बोर्ड हाती धरत मंगळवारी सकाळी काम बंद पाडण्यासाठी गेलेल्या चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यात आणखी काही जण रडारवर आहेत. दरम्यान, शहर सुधार समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून मैदान वाचवा अशी विनंती करण्यात आली आहे.

सातारा पालिकेकडून जे काही विकासात्मक होत असेल त्यामध्ये काहीतरी त्रुटी काढून शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, प्रा. विक्रांत पवार, सौ. पवार, मुनवर कलाल अशा चार जणांसह इतरांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुरुवार परज येथील सुरु असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाच्या ठिकाणी बॅनर लावून तेथील जेसीबीला काम करण्यास अटकाव केला. यावेळी जेसीबीच्या चालकाने अटकाव होत असल्याने त्याबाबत माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. पालिकेचे अधिकारी मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम, अभियंता प्रतिक वैराट यांच्यासह पथक तेथे पोहचले. तेव्हा त्यांनी शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्याचा पवित्रा पाहून तेथून शहर पोलीस ठाणे गाठले. तर शहर सुधार समिती व त्यांच्यासोबत असलेल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तोपर्यंत जेसीबी हा बाहेरच उभा होता. जेबीसी आत मध्ये गेलेला नव्हता. पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामामध्ये अटकाव करणाऱ्या चार जणवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अभियंता प्रतिक वैराट यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्यांच्यासोबत जे आंदोलनकर्ते होते तेही पालिका आणि पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्यावतीने हे शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर विकास कामात जे-जे अडथळे निर्माण करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून काम तडीस नेण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सातारा पालिकेच्या या शॉपिंग कॉम्लेक्सच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देवून तक्रार केली आहे. शाळेचे मैदान वाचवा अशी त्यांनी विनंती केली आहे.

जे शहरात रहात नाहीत. जे त्या भागातले नाहीत. जे त्या वॉर्डातले नाहीत. तरीही पालिकेच्या विरोधात, शासनाच्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनात सहभागी होवून पालिकेला, सरकारला टार्गेट करत आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनांना, शासनाच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचा फंडा अलिकडच्या काळात सुरु झालेला असून विरोधासाठी विरोध हाच फॉम्युर्ला यांच्याकडून आजमावला जात आहे, अशीही चर्चा सातारा शहरात सुरु आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणार 500 ई जात प्रमाणपत्रांचे वितरण
पुढील बातमी
दहिवडी-वडूज रोडवर तिहेरी अपघातात औंध येथील दोघांचा मृत्यू

संबंधित बातम्या