वीज वितरण च्या वाढीव दराचे भिजत घोंगडे

ज्यादा वीजबिलांमुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते वैतागले

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना थ्री फेज कनेक्शन साठी व्यावसायिक दराने परवानगी देण्याचा मुद्दा वादाचा ठरला आहे. प्रत्येक मंडळांना दहा दिवसाचे येणारे बिल हे वीस हजार पेक्षा अधिक असल्याने गणेशोत्सवातील विद्युत रोषणाई ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना फटका देणारी ठरली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील वीजदर हे घरगुती दराने असावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना या शासकीय अध्यादेशाबाबत पुरेसे ज्ञान नसल्याचे समोर येत आहे. तसेच काही मंडळांनी दोन वर्षांपूर्वी भरलेल्या आगाऊ रकमा अद्याप वीज वितरण कडून माघारी दिले गेलेल्या नाहीत त्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते व वीज वितरण कंपनी व्यवस्थापन आमने-सामने आले आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवामध्ये घरगुती दराने वीजदर आकारला जावा, अशी मागणी आहे. मात्र हा दर धार्मिक कालावधीसाठी विशेष स्वरूपाचा आहे. याबाबत अध्यादेश असल्याचे सातारा शहर विभागाचे उपाभियंता अजित नवाळे यांनी सांगितले होते. मात्र ही आकारणी वन फेज कनेक्शन साठी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात सातारा शहरातील सव्वा तीनशे मंडळांना थ्री फेज कनेक्शनची आवश्यकता असते. याबाबत काही मंडळाकडून माहिती घेतली असता त्यांना वीज वितरण कंपनीने गतवर्षी वीस रुपये प्रति युनिट दराने वीज आकारणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मंडळांनाही बिले 25 ते 30 हजार रुपयांच्या घरात आल्याने त्यांच्या थकबाकी अजूनही प्रलंबित असल्याचे दिसत आहे.

वीज वितरण कंपनी सातारा परिमंडळाचे कार्यकारी अभियंता ए. के. बारटक्के यांनी यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये या संदर्भात असलेल्या शासकीय अध्यादेशावर चर्चा होणार आहे. आता कार्यकर्त्यांना गणपती मध्ये वीजदर घरगुती दराने आकारला जाणार की व्यावसायिक दराने, हाच प्रश्न महत्त्वाचा आहे, याबाबत वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने चर्चा करून मार्ग काढावा, अशी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने नियमावर बोट ठेवल्यास हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनू शकतो. त्यामुळे समन्वय समितीने बैठकीमध्ये चर्चा करून मार्ग काढून तात्काळ याविषयी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारचे ज्येष्ठ नागरिक डॉल्बीच्या विरोधात
पुढील बातमी
महिलांच्या विनयभंग प्रकरणी एका पोलिसासह अन्य तीनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या