मुंबई : महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेने राज्यातील तब्बल ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून मोठे यश संपादन केले आहे. अत्यंत तातडीच्या परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना आवश्यक उपचार देत सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्याचे काम या सेवेने प्रभावीपणे पार पाडले आहे.
राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) द्वारे संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही सेवा कार्यरत असून, नागरिकांना तत्काळ व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय मदत देण्यावर भर दिला जात आहे.
आदिवासी भागातही प्रभावी सेवा
विशेष म्हणजे राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्येही या सेवेचा मोठा लाभ झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १,२१,६८५ अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
५८९ अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत
याशिवाय, राज्यातील महत्त्वाच्या समृद्धी महामार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) वरही १०८ सेवेची तत्परता दिसून आली आहे. या महामार्गावर २४ तास कार्यरत असलेल्या २१ आपत्कालीन पथकांद्वारे आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे.
बीव्हीजीने देशात सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यामागे संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रासोबतच जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे चालवली जात आहे.
नागरिकाला तातडीची व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय
बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. समाजातील प्रत्येक नागरिकाला तातडीची व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.”
ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान १०८ रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून उल्लेखनीय कार्य केले. या शौर्यपूर्ण सेवेच्या गौरवार्थ लवकरच या ‘वीर योद्ध्यांचा’ सन्मान करण्यात येणार आहे.
आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ
एकूणच, १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ ठरत असून, शहरी तसेच दुर्गम आणि आदिवासी भागांमध्येही जीवनरक्षक ठरत आहे
अधिक माहितीसाठी संपर्क - विशाल केदारी, माध्यम संयोजक बीव्हीजी , मो. क्र : ८८३०५९०४१३ , ७७१९८६००५८