बांगलादेश : बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमिम इक्बालला ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे. मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली.
मीडिया वृत्तानुसार, तमिमला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु ते उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून फझिलातुन्नेसा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, तमिमची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याला ढाका येथे हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्याची प्रकृती बघता त्याला लगेच शिफ्ट करणं धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशीष चौधरी यांनीही तमिमला हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली आहे.
तमिम इक्बालने जुलै २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तमिमने बांगलादेशकडून ७० कसोटी, २४३ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळले असून अनुक्रमे ५१३४, ८३५७ आणि १७७८ धावा केल्या आहेत.