सातारा : साताऱ्यात एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून एका युवकाने धमकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत प्रसंगावधान राखून अमोल इंगवले, उमेश अडागळे यांनी त्या युवकाला अडवून त्या मुलीची सुटका केली आणि तिचे प्राण वाचवले. अमोल आणि उमेश यांचे धाडस कौतुकास्पद असून या दोघांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
साताऱ्यातील करंजे येथे एका इमारतीसमोर एकतर्फी प्रेमातून एका युवकाने एका शाळकरी मुलीला पकडून तिच्या गळ्याला धारदार चाकू लावून तिला धमकावत असल्याचा प्रकार समोर आला होता. या थरारक घटनेत त्याठिकाणी असलेल्या अमोल व उमेश यांनी प्रसंगावधान राखून त्या विकृत युवकाला पकडून त्याच्या तावडीतून त्या मुलीची सुटका केली. यावेळी अमोल याच्या हाताला चाकू लागला तरीही त्याने युवकाला पकडून ठेवले. या दोघांच्या साहसामुळे त्या शाळकरी मुलीचे प्राण वाचले. या दोघांच्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला. याबद्दल या दोघांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी या दोघांचाही सत्कार करून आभार मानले. यावेळी सचिन कांबळे, अक्षय जगताप, जतीन वाघमारे, अजय जाधव, रविंद्र बाबर, अजय अडागळे आदी उपस्थित होते.
अशा घटना घडत असताना अनेकजण व्हिडीओ काढण्यात धन्यता मानतात पण, बचावासाठी कोणीही पुढे येत नाही. मात्र साताऱ्यातील घटनेत अमोल आणि उमेश यांनी पुढे येऊन मुलीचे प्राण वाचवले आणि आपला सातारी बाणा दाखवून दिला आहे. या दोघांचे धाडस सर्वांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. या दोघांनी समाजाला एकप्रकारे आरसा दाखवला असून त्यांच्या धाडसाबद्दल मी त्यांचे तमाम सातारकरांच्या वतीने आभार मानतो, अशा शब्दात ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी या युवकांचे कौतुक केले.