महाबळेश्वर : निसर्गवैभवाचा आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग मानल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन ‘द क्लब’च्या गोल्फ मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या स्थळ पाहणीत हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील आणि हेरिटेज ग्रेड १ दर्जा प्राप्त असलेल्या ‘द क्लब’च्या गोल्फ मैदानासाठी सपाटीकरण व गवत लागवडीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परवानगीचा गैरवापर करून मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आहे. मैदानावर मातीचे मोठमोठे ढिगारे उभारून टेकड्यांचे स्वरूप देण्यात आले असून, परिसरातील जंगल क्षेत्रात अंतर्गत तीन नवीन रस्ते तयार करण्यात आल्याचे पाहणीत आढळले.
यावेळी अंजन, जांभूळ यांसह विविध प्रजातींची ३० हून अधिक झाडे तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तोडलेली झाडे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जमिनीत गाडल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. याशिवाय मैदानाभोवती आठ ते नऊ फूट उंचीचे तारेचे कंपाऊंड उभारण्यात आले असून, विनापरवाना मोठे पत्र्याचे शेड ही उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. मैदान परिसरातील रस्ते बंद करून प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आल्याने दररोज फिरण्यासाठी येणाऱ्या स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून मैदानात प्रवेश नाकारण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार पर्यावरणप्रेमी अनिल पंडित आणि बाळासाहेब पांचाळ यांनी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्याकडे केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत डॉ. खरमाटे यांनी गुरुवारी सकाळी गोल्फ मैदानाची पाहणी केली. पाहणीदरम्यान वृक्षतोड आणि अनधिकृत शेड उभारणीचे प्रकार त्यांच्या निदर्शनास आले.
परवानगीच्या चौकटीबाहेरील कामांची माहिती नाही...
पाहणीदरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील आणि वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांना याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तर तहसीलदार सचिन मस्के यांनी परवानगीच्या चौकटीबाहेरील कामांची माहिती प्रशासनाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यावर डॉ. खरमाटे यांनी नाराजी व्यक्त करत नगरपरिषद, महसूल व वन विभागाने संयुक्त पंचनामा करून अटींचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले.
तहसील, पालिकेपासून हाकेच्या अंतरावर
दरम्यान, तहसील कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नव्हती, याबद्दल महाबळेश्वरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देवस्थान ट्रस्टची ६५ एकर जागा
‘द क्लब’चे गोल्फ मैदान हे महाबळेश्वरच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असून ते हेरिटेज ग्रेड एकमध्ये समाविष्ट आहे. या मैदानातील ६० ते ६५ एकर जमीन श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे. ब्रिटिशकालीन ही जमीन ‘द क्लब’ला ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. हा करार २०४० मध्ये संपुष्टात येणार आहे. अत्यल्प वार्षिक भाड्यावर असलेल्या या मोक्याच्या जागेचे पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व असल्याने मैदानाचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महाबळेश्वरमध्ये रंगू लागली आहे.
चौकशीकडे सर्वांचे लक्ष
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल, वन व नगरपरिषद विभागाच्या संयुक्त पंचनाम्यातून नेमके किती उत्खनन झाले, किती झाडांची कत्तल झाली आणि परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाले का, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागले आहे.