सोनप्रयाग ते केदारनाथ ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत !

by Team Satara Today | published on : 06 March 2025


मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिर देश विदेशातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ बद्रिनाथला भेट देत असतात. मात्र दऱ्याखोऱ्यांचा १६ किलोमीटरचा अतिशय खडतर मार्ग पार करून भाविकांना इथपर्यंत पोहोचावं लागतं. कोणतंही वाहन नाही, तब्बल ९ तास पायपीट किंवा खेचराच्या, माणसांच्या पाठीवरून सवारी करावी लागते. मात्र करोडो भाविकाचा हा खडतर प्रवास सोपा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 9 तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटात करता येईल, असा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. ४,०८१ कोटी निधीतून १२.९ किमी लांबीचा रोप वे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे केदारनाथमध्ये काय बदल होणार. कोणत्या भाविकांना याचा फायदा होणार, जाणून घेऊया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले. त्यात सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ रोपवे प्रकल्पासाठी ४,०८१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून ९ तासांचा प्रवास फक्त ३६ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

कोणते बदल होतील?

सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत रोपे वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिशय कठीण चढाईतून भाविकांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः वृद्ध आणि अपंग भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करता येणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांचा वेळ वाचेल. तब्बल ८.२४ तास वेळ वाचणार आहे.

मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरनंतर, आणखी एक पर्याय भाविकांसाठी खुला होईल.

मंदिरात पोहोचण्यासाठी तीन मुख्य पर्याय

पहिला पर्याय – पादयात्रा

दुसरा पर्याय – खेचराची सवारी

तिसरा पर्याय – हेलिकॉप्टर राइड

कशी असते केदारनाथपर्यंतची पदयात्रा?

केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना आधी सोनप्रयागला पोहोचावं लागतं. सोनप्रयाग येथे भाविकांची नोंदणी होते. यासाठी ऑनलाइन पर्याय देखील उपलब्ध आहे. सोनप्रयाग येथील मंदाकिनी नदीवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर, यात्रेकरूंना सोनप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत चारचाकी वाहने मिळतात. ज्याचे भाडे साधारणपणे प्रति व्यक्ती ५० ते ६० रुपये आकारलं जातं. केदारनाथला जाणारा ट्रेकिंग मार्ग गौरीकुंडपासून सुरू होतो. हा ट्रेकिंग मार्ग १६ किलोमीटरचा आहे, परंतु नवीन मार्गाने ( केदारनाथ दुर्घटनेनंतर बांधण्यात आलेला मार्ग) हा प्रवास खूप वेळखाऊ आणि कठीण आहे.

गौरीकुंड ते जंगलचाट्टी हा प्रवास सुमारे ४ किलोमीटरचा आहे.

जंगलचट्टा ते भीमबाली पर्यंतचा प्रवास सुमारे ३ किलोमीटरचा आहे.

भीमबालीनंतर पुढचा थांबा लिंचोली सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे.

लिंचोली ते बेस कॅम्प हा प्रवास सुमारे ४ किलोमीटरचा आहे.

केदारनाथ मंदिर बेस कॅम्पपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आहे.

खेचराची सवारी

केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खेचराची सवारी आहे. अनेक भाविक खेचराच्या सवारीने प्रवास करतात. गौरीकुंडवरून वर चढताच, एक खेचर बुकिंग काउंटर आहे. तिथे खेचर एका निश्चित शुल्काच्या आधारावर बुक केले जाते. मात्र भाविकांनी जर वाटेत खेचर बुक केलं तर त्यांच्याकडून मनमानी रक्कम आकारली जाते. केदारनाथ मंदिराच्या सुमारे एक किलोमीटर आधीपर्यंतच खेचराची सवारी करता येते.

हेलिकॉप्टर राईड

केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करणारे भाविकांकडे ऑनलाइन बुकिंगचा पर्याय आहे. केदारनाथला जाण्यासाठी तीन केंद्रांवरून हेलिकॉप्टर बुकिंग केलं जातं.

पहिला पर्याय म्हणजे गुप्तकाशी हेलिपॅड, जिथून केदारनाथसाठी थेट हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. हा पर्याय सर्वात महाग आहे.

दुसरा पर्याय म्हणजे फाटा हेलिपॅडवरून केदारनाथला प्रवास. फाटा येथून केदारनाथची हेलिकॉप्टर ट्रिप गुप्तकाशीपेक्षा थोडी स्वस्त आहे.

तिसरा पर्याय म्हणजे सिरसी हेलिपॅडवरून केदारनाथ प्रवास. सिरसी ते केदारनाथ हा हेलिकॉप्टर प्रवास सर्वात स्वस्त पर्याय आहे.

बनारस आणि वैष्णोदेवीनंतर आता केंद्र सरकारने केदारनाथमध्ये रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी, स्थानिक दुकानदार, पोनी आणि पालखी वाहकांनी वैष्णोदेवी येथे रोपवे प्रकल्पाविरुद्ध निषेध केला होता. मात्र आता केदारनाथला जाणाऱ्या रोपवे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार त्याची अंमलबजावणी कशी करते, काम कधी सुरू होईल आणि ते कधी पूर्ण होईल? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मणका आणि पाठीच्या कण्याला सूज आली आहे?
पुढील बातमी
रवीना टंडनने तिचे सोन्याचे कानातले काढून थेट पापाराझीला गिफ्ट म्हणून दिले

संबंधित बातम्या