कराड : आदित्य याने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटावा, असे यश मिळवले. त्याने वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज झाले; पण त्याच्या यशाचा क्षण त्याच्याशिवाय अनुभवावं लागणं, ही त्याच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांसाठी मोठी शोकांतिका आहे.
आदित्यचे हे यश कुटुंबासह, गावकऱ्यांना आयुष्यभर बोचत राहील, अशा शब्दांत आदित्यचे कुटुंबीय व घोणशी गावातील त्यांचे हितचिंतक व ग्रामस्थांनी भावना व्यक्त केली आहे. आदित्यच्या दहावी परीक्षेतील देदीप्यमान यशानंतर संपूर्ण घोणशी गाव गहिवरून गेले आहे. मूळ राहणार घोणशी (ता. कराड) व सध्या राहणार आकुर्डी (पुणे) प्राधिकरणातील आदित्य नानासाहेब पिसाळ याची ही दुःखद कहाणी आहे. पुण्याच्या सीएमएस इंग्लिश सेकंडरी स्कूलमध्ये तो शिकत होता.
अवघ्या महिन्याभरापूर्वी आसखेड बुद्रुकच्या कुंड धबधब्यात तो मित्रांसमवेत पोहायला गेला; परंतु दमछाक झाल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पिसाळ कुटुंबासह संपूर्ण घोणशी गाव परिसर शोकमग्न झाले. आदित्यने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. मात्र, ते पाहण्यासाठी तो या जगात नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर त्याची गुणपत्रिका पाहताना त्याच्या आई-वडिलांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
आदित्यच्या शिक्षिका आराधना जगताप म्हणाल्या, ‘‘हा निकाल आदित्यच्या मेहनतीचे फळ आहे. त्याची मेहनत, यशाचा अभिमान त्याचे आई-वडील, शिक्षक आणि मित्रांच्या हृदयात सदैव जिवंत राहील. आदित्यचे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’’
आदित्यने दहावी परीक्षेत मिळविलेल्या यश कौतुकास्पद आहे; पण ते यश व कौतुकाचे क्षण पाहण्यासाठी तो आपल्यात नाही; परंतु त्याची मेहनत आणि यशाचा अभिमान सर्वांना आहे. आदित्यच्या यशाने घोणशी गाव गहिवरले आहे.
- पंकज पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य, घोणशी