कास : जावळी तालुक्यातील घनदाट जंगल, नद्यांची खोरी आणि मॉन्सूननंतर खुललेल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांची पावले इकडे वळत आहेत. हिरवेगार डोंगर, धुक्याची दुलई आणि जागोजागी आढळणारे विविधरंगी फुलांच्या प्रजातींमुळे जावळी खोऱ्याच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे.
जावळी तालुका दुर्गम म्हणूनच ओळखला जातो. जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार याच तालुक्यात असून, सध्या कासचा हंगाम ऐन बहरात आहे. कासबरोबरच बामणोली, मुनावळे, वासोटा किल्ला, सह्याद्रीनगर आदी निसर्ग पर्यटनस्थळे आहेत, तर क्षेत्र कुसुंबीची काळूबाई, मेरुलिंग आदी धार्मिक स्थळ आहेत.
पर्यटनाचा खजिनाच या भागात असला, तरी पायाभूत सुविधांची वानवा असल्याने म्हणावे तसे पर्यटक येत नाहीत.
जागतिक वारसा स्थळ कास जावळीत असले, तरी त्याचा तालुक्याला आर्थिकदृष्ट्या फायदा होत नाही. पुणे- बंगळूर महामार्गापासून तालुक्याला जोडणारा व कोकणात थेट जाणारा पाचवड- मेढा- कुसुंबी ते सह्याद्रीनगरवरून बामणोली ते खेड असा प्रस्तावित महामार्ग झाल्यास या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढून तालुक्यातील तरुणांना पर्यटन पूरक रोजगार निर्माण करता येणार आहे.
तालुक्याची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. येथे कोणताही औद्योगिक प्रकल्प नसल्याने व शेती अल्प असल्याने पर्यटनातूनच या भागाचा विकास शक्य असून, याकडे प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अशी भावना सर्वसामान्य जावळीकरांची आहे.