सातारा : माहेरी निघून जा, अन्यथा तुला व तुझ्या मुलींना ठार मारू, अशी धमकी देत पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू यांच्यासह सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोडोली अमरलक्ष्मी येथील राधाकृष्ण कॉलनी, मयूर पार्क अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ऐश्वर्या राहुल साळुंखे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती राहुल यशवंत साळुंखे व सासू शकुंतला साळुंखे हे लहानसहान कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व हाताने मारहाण करत होते.
तसेच ननंद अर्चना यादव, दीर मयूर साळुंखे, नंदावा दीपक यादव व संतोष यादव हे घरी येऊन, “तू आमच्या भावाला त्रास देतेस, नीट वागत नाहीस. तुझी आता गरज नाही. तू तुझ्या माहेरी लातूर येथे निघून जा,” असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. माहेरी न गेल्यास तुला व तुझ्या मुलींना मारून टाकू, अशी धमकी देत मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करत आहेत