सातारा : स्वच्छ भारत अभियान ग्रामीण 2025 अंतर्गत देशव्यापी सर्वेक्षणात अभिप्राय (फीडबॅक नोंदणी) नोंदविण्यात राज्यातील ३४ जिल्ह्यात सातारा आघाडीवर आहे. तसेच यासाठी आणखी 15 ऑगस्टपर्यंत फीडबॅक नोंदणी करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त फीडबॅक नोंदवून जिल्ह्याचे अव्वल स्थान कायम ठेवण्यात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेकडून मिळालेली माहिती अशी की, गावपातळीवरील स्वच्छतेचे मूल्यमापन हे नागरिकांच्या थेट अभिप्रायावर आधारित आहे. यासाठी केंद्र सरकारने ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी या ॲपमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. तसेच ॲपव्दारे नागरिकांना त्यांच्या गावातील शौचालय वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासंबंधी फक्त १३ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे सर्वेक्षण केवळ दोन मिनिटांचे असून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा जिल्ह्याच्या गुणांकनावर प्रभाव पाडणारा आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आलेले आहे.
दरम्यान, याबाबत पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनीही माहिती दिली. मोबाइलवरून ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर मोबाइल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉगइन करावे. त्यानंतर १३ प्रश्नांची उत्तरे देऊन सहभाग नोंदवावा. या प्रक्रियेसाठी क्यूआर कोडही उपलब्ध आहे, असेही माने यांनी स्पष्ट केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणसाठी एक हजार गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. तर नागरिकांचा सहभाग आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र स्तरावरून नियुक्त केलेली सर्वेक्षण समितीही जिल्ह्यात सोमवार, दि. २८ पासून तपासणी करणार आहे. या तपासणीसाठी ग्रामपंचायतींनीही सज्ज राहावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.