तारळे : शेकडो वर्षांची परंपरा असलेला व तारळेसह परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भीमसेन-कुंती माता उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. भीमसेन महाराज की जय, कुंती माता की जय असा जयघोष करत सूर्यास्त समई तारळी नदीत प्रथम कुंती मातेचे व नंतर भिमसेन महाराजांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तारळी नदी परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. प्रथेप्रमाणे यंदाही पावसाने मूर्तीवर अभिषेक केला.
रविवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बाराच्या आसपास जाधव गल्लीतील मानाचे उदबत्तीचे झाड वाजत गाजत, गुलालाची उधळण करत सभामंडपाजवळ आणण्यात आले. यावेळी गुलाल खोबर्याची उधळण करत फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय चा घोष केल्यानंतर महाआरती करण्यात आली. नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी मोदकाचा नैवेद्य घेऊन हजारो भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
यंदा मच्छिंद्र सूर्यवंशी (खेराडे वांगी) यांच्या तर्फे महाप्रसाद देण्यात आला. सोमवार यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी ग्राम प्रदक्षिणेसाठी कुंतीमातेचा रथ बाहेर पडला. घरोघरी रांगोळ्या घालून कुंतीमातेचे औक्षण करत खाननारळाने ओटी भरण्यात येत होती. दुपारी ग्रामप्रदक्षिणा करून कुंती मातेचा रथ सभामंडपाजवळ पोहचला. यावेळी भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय चा जयघोष करत गुलाल खोबर्याची उधळण करण्यात आली. पुढे कुंती मातेचा तर पाठीमागे भिमसेन महाराजांचा रथ अशी मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्ये व डीजेचा दणदणाट मिरवणुकीत घुमत होता. या वाद्याच्या तालावर तरुणाई थिरकत होती. डीजेची भिंत कमी करून पोलिसांनी आवाज कमी केल्याने भाविकांनी मिरवणूकीचा आस्वाद घेता आला. सूर्यास्तासमई मिरवणूक तारळी नदीवर पोहचली. त्यावेळी महाआरती करून प्रथम कुंतीमातेचे व नंतर भिमसेन महाराजांच्या मूर्तीचे तारळी नदी पात्रात विसर्जन केले. विसर्जनचा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी तारळी नदीच्या परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.