...नाहीतर राज्यात चक्काजाम आंदोलन करू; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सरकारला इशारा, शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

by Team Satara Today | published on : 27 August 2026


मुंबई : बेरोजगारीच्या मुद्द्यासह राज्यातील अनेक विषयांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज संपूर्ण राज्यात बेरोजगार हक्क एल्गार राज्यव्यापी तिरंगा मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारला इशारा दिला आहे. आम्ही आंदोलनाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. जर महिनाभरात सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही राज्यात चक्काजाम आंदोलन करू असं शिंदेंनी म्हटलं आहे. 

मुंबईत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तिरंगा मोटारसायकल मोर्चा‘ पार पडला. यावेळी ते म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून एमआयडीसीमध्ये स्थानिकांना रोजगार, रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती, पेपरफुटी रोखणे आणि पोलीस भरती वेळेत करणे यासह अनेक प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रत्येक जिल्हा व विभागामध्ये प्रमुख ठिकाणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा मोटरसायकलवरून काढण्यात आला आहे. शासकीय विभागांमधील प्रत्येक रिक्त पदाची भरती, पोलीस भरती तसेच औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी राज्यातील तरुणांना मिळाल्या पाहिजेत. आमच्या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल आणि राज्यातील तरुण बेरोजगार राहणार नाहीत असं त्यांनी म्हटलं.

तसेच पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राने कायदा केला. मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असतानाही त्या भरल्या जात नाहीत. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात राज्यात येत आहे म्हणून उद्योगांना जमीन, वीज आणि पाणी दिले जाते. मात्र त्याच्या मोबदल्यात राज्यातील तरुणांना रोजगार मिळतो का? स्थानिक तरुणांना नोकरी देण्याचा कायदा असतानाही उद्योग राज्यात येतात तेव्हा नोकरीच्या संधी मात्र बाहेरील लोकांना दिल्या जातात असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.

दरम्यान, MPSC पेपरफुटी प्रकरणात आयोगाचे सचिव आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये भाजपाचे आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही दोषी आढळल्यास राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालू नये. त्यांच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थासाठी आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आली नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण आता थांबले पाहिजे असा टोला शशिकांत शिंदे यांनी सरकारला लगावला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विजापूर येथील भूतनाळ तलावात एकाच कुटुंबातील सहाजणांचे मृतदेह; घटनेने परिसरात खळबळ, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
पुढील बातमी
महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटक नेपाळमध्ये सुरक्षित; शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि मैत्रिणींचा समावेश

संबंधित बातम्या